शिवजयंती जबरदस्त भाषण/शिवाजी महाराज भाषण | Shivaji Maharaj bhashan/Shivjayanti 2020


शिवजयंती भाषण 2020

बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय....

जय भवानी...जय शिवाजी...

ज्यांच्या कुशीतच स्वराज्याच देखणं स्वप्न निर्माण झालं त्या थोर राजमाता जिजाऊ, स्वराज्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने साकार करणारे जिजाऊपुत्र आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या वारसदाराने  हे स्वप्न स्वतःच्या खांद्यावर झेललं शिवपुत्र संभाजीराजे आणि स्वराज्याच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता शिवरायांसाठीच जगायचं आणि त्यांच्यासाठीच मरायचं असा निश्चय करून शिवरायांना लाखमोलाची साथ देणारे छत्रपती शिवरायांचे मावळे यांना मानाचा मुजरा करून मी माझे मनोगत व्यक्त करतो.



मित्रांनो, शिवजन्मापूर्वीचा काळ फार भयंकर होता.वर्षानुवर्षे गुलामगिरीचे राज्य चालत आले होते.जन्म घ्यायचा गुलामगिरीत,जगायचे देखील गुलामगिरीत आणि मरायचं देखील गुलामगिरीतच.अशा गुलामगिरीच्या दुष्टचक्रात पिढ्यानपिढ्या मरत होत्या.पण गुलामगिरी थांबण्याच नाव घेत नव्हती.या काळात सहसा कोणी विरोधात जात नव्हते आणि जर कोणी विरोधात गेलं तर त्याला मरणयातना किंवा थेट मरणच मिळायचे.अशी स्थितीतच राजमाता जिजाऊनी स्वराज्याच स्वप्न पाहिलं होतं.त्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार करणं खुप अवघड होत कारण हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणार कोण?हा प्रश्न सर्वांपुढे उपस्थित होता.पण मित्रानो एक दिवस असा उजाडला आणि सर्वांना वाटायला लागलं की आता हजारो वर्षांची गुलामगिरीतून आपण मुक्त होणार आणि स्वराज्य निर्माण होणार...आणि तो दिवस म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630.या दिवशी एक सोनेरी पहाट झाली आणि शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि संपूर्ण शिवनेरीचा आनंद गगनात मावेनासा झाला.शिवनेरीवरून तेजस्वी सूर्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.

शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते.त्यांना जिजाऊंची शिकवण आणि वडील शहाजीराजेंकडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच त्यांनी बालवयातच अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले होते.अवघ्या 15 व्या वर्षी स्वराज्याच स्वप्न उराशी बाळगून रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी जीवाला जीव देणाऱ्या मावळयांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली.स्वराज्य निर्माण करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती तर त्यासाठी अनेक मावळ्यांनी,शिवसैनिकांनी आपले प्राण पणाला लावले.बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, मुरारबाजी देशपांडे,शिवा काशीद,संताजी घोरपडे, कोंडाजी फर्जंद, शेलारमामा अशा अनेक वीरांनी शिवरायांना साथ दिली.मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने गनिमीकावा खेळत दुश्मनांना पळता भुई थोडी केली. जिजाऊंनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरू लागले होते अखेर शिवरायांनी अनेक लढाया जिंकून गड-किल्ले जिंकले,परकीयांची गुलामी संपवली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि अन्यायरुपी अंधकाराच्या काळोखात बुडालेल्या जनतेला प्रकाशात आणलं.

म्हणूनच म्हणतो मित्रांनो....


  • ना भूमीच्या तुकड्यासाठी,
  • ना सोन्याच्या सिंहसनासाठी,
  • माझा राजा लढला फक्त
  • जनतेच्या सुखासाठी...
पण मित्रांनो,आजचा महाराष्ट्र, आपल्या जिजाऊंचा महाराष्ट्र,छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेने जाताना दिसतोय... होय हे खरं आहे...अरे कुठं हरवलाय आपला महाराष्ट्र...कुठं हरवलाय महाराष्ट्राची ताकद...कुठं हरवलाय आपला भगवा झेंडा...कुठं आहे आपलं सळसळत रक्त...आजच्या काळात युवा पिढी पूर्णपणे बिघडत चालली आहे.आजही आपल्या महाराष्ट्रात जाती-धर्मावरून भांडणे होत आहेत पण आपल्या शिवरायांनी कधी जातीभेद मानला नाही हे आपण विसरत चाललो आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात परस्त्री ला देवीसमान,आईसमान मानलं जायचं आणि त्याच महाराष्ट्रात महिलाच सुरक्षित नाहीत.कोपर्डी सारख्या घटना वारंवार घडत आहेत यासारखी वाईट गोष्ट कुठली नाही.अरे मुलगी म्हणजे कुणाच्या बापाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही कोणीही येईल आणि कसाही वापर करेल.आज महिलांना खरी गरज आहे ती तुमच्या आधाराची...
पण आज आपण मोबाईलमध्ये इतके गुंग झालोय की आपल्या कुटुंबालाही वेळ द्यायला शिल्लक नाही.मग हा प्रश्न कसा सुटेल?अरे छेडछाड करणाऱ्याला धडा शिकवायला 5 मिनीटेदेखील लागणार नाहीत.आपल्या महाराष्ट्रात पर्यटनाच्या बहाण्याने किंवा 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी दारू,गांजा,सिगारेट घेऊन पर्यटक येतात अरे त्यांची लायकी आहे का माझ्या शिवरायांच्या गड-किल्ल्यावर येण्याची...अशा नराधमांनाही पळता भुई थोडी करण्याची गरज आहे...



आज महाराष्ट्रातील प्रत्येकाने शिवरायांच्या गड-किल्ल्यांचे,महिलांचे रक्षण करणे आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानता सर्वांनी मिळून-मिसळून गरजेचे आहे..

मित्रांनो, जाता जाता फक्त एवढंच सांगू इच्छितो की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांमधला एक जरी गुण आपण अंगीकृत केला तर राजे मनापासून खुश होतील आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांना आणि मावळ्यांना हाच खरा मानाचा मुजरा ठरेल...

आणि म्हणूनच म्हणतो मित्रांनो,
  • राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस...
  • राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ...
जय भवानी...जय शिवाजी...हर हर महादेव...



टिप्पण्या